माझी वसुंधरा ४.० व ५.० अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग दोन वर्षे पुरस्कार

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते ११ कोटींचे पुरस्कार महानगरपालिकेला प्रदान

शहरासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे चांगली कामगिरी : आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर – राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये पुरस्कार मिळाला आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला ५ कोटींचे तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच, मागील वर्षी माझी वसुंधरा ४.० अभियानातही राज्यात ६ कोटींचा दुसरा पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही ११ कोटींच्या पुरस्कारांचे वितरण राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व आयुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मुंबई येथील कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. माझी वसुंधरा अभियानात गेली दोन वर्षे महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवला. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग व सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे महानगरपालिका ही चांगली कामगिरी करू शकली, असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर महानगरपालिकेने माजी वसुंधरा अभियान २.० मध्ये १.५० कोटी, ३.० मध्ये ६.०० कोटी, ४.० मध्ये ६.०० कोटी, ५.० मध्ये ५ कोटी अशी १८.५० कोटी रुपयांची पारितोषिक महानगरपालिकेने मिळवली आहेत. शहरात विविध उद्याने हरित क्षेत्र, सौर ऊर्जेचे प्रकल्प, वृक्षारोपण तसेच वसुंधरेबाबत जनजागृती आदी उपक्रमांसाठी या निधीचा वापर करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत दुसऱ्या तिमाहीमध्ये हरित शपथ घेण्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात तीन ते दहा लक्ष लोकसंख्ये गटामध्ये प्रथम स्थानी होती. शहरातील १,४८,८९५ नागरिकांनी वैयक्तिक हरित शपथ घेतली. तर २००२ समुहांनी सामूहिक शपथ घेतली होती, असेही आयुक्त डांगे यांनी सांगितले. तसेच महानगरपालिकेने नुकतेच ई-गव्हर्नन्स व सेवा कर्मी अभियानातही राज्यात अव्वल पुरस्कार मिळवला आहे. महानगरपालिकेला सक्षम व गतिमान बनवून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

येत्या वर्षात प्रथम पारितोषिक
मिळवण्याचे उद्दिष्ट : महापौर
माझी वसुंधरा ६.० या अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेने तीन ते दहा लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी व अधिकारी नियोजन करून उपाययोजनांमध्ये सुधारणा करत आहेत. सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन महानगरपालिकेचा राज्यात नावलौकिक निर्माण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ज्योती गाडे यांनी केले आहे.

स्वच्छतेमुळे शहराचे आरोग्य
सुदृढ राहते : उपमहापौर
स्वच्छता हा केवळ सौंदर्यीकरण अथवा सुशोभीकरणाचा भाग नाही. स्वच्छतेमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर शहराच्या विकासात नागरिकांचे योगदानही वाढते. या सर्व सकारात्मक बाबींतून शहराच्या प्रगतीला चालना मिळते. येत्या काळात सर्व नागरिकांना एकत्र आणून सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जातील, असे मत उपमहापौर धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

महानगरपालिकेने माझी वसुंधरा
अभियानांतर्गत केलेली कामगिरी
भूमी : या घटका अंतर्गत मनपाने वर्षभरात देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली. झाडाचे संगोपन करून त्यांना जगवले. कचऱ्याचे घरोघरी संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती. शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा कायम ठेवला.

वायू : या घटकात मनपाने अभियान कालावधीत हवेची गुणवत्ता तपासून त्यावर उपाययोजना केल्या. सण उत्सवात प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. सातत्याने स्वच्छता मोहिमा राबवतात शहरातील तयार होणारा बांधकाम, पाडकामाचा राडारोडा, कचरा उचलून विल्हेवाट लावण्यात आली.

जल : या घटकात मनपाने शहरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाय योजना केल्या. शहरातील पाणीसाठ्यांची साफसफाई केली. शहरातील सीना नदी पात्रात स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक इमारतीचे वाटर ऑडिट करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. गणपती विसर्जन दरम्यान जल प्रदूषण टाळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंड तयार केले. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना त्याचे फायदे तोटे समजावून सांगून इको फ्रेंडली मूर्तींच्या विक्रीसाठी व नागरिकांनी खरेदी करावी यासाठी प्रयत्न केले.

अग्नी : या घटकात मनपाने शहरात एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे काम केले. शहरात विविध ठिकाणी सोलार प्लांट लावले. खाजगी तत्त्वावर घरांवर सोलर बसवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच सार्वजनिक इमारतीचे एनर्जी ऑडिट करून त्यावर उपाययोजना केल्या.

आकाश : या घटकात मनपाने नागरीकांमध्ये अभियानाची माहिती पोहोचण्यासाठी स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली. शहर हरित करण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. शहरातील पर्यावरण प्रेमी व्यक्तींची पर्यावरण दूत म्हणून निवड करून विविध कार्यक्रमाद्वारे व त्यांच्या सहभागाने शहरात जनजागृती करत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण केले. या सर्व उपाययोजांमुळे महानगरपालिकेला या वर्षीही पुरस्कार मिळाला आहे.

माझी वसुंधरा २.०,३.०,४.० अभियान अंतर्गत महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी

निर्सगातील पंचतत्वासोबत जीवन पध्दती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचही अस्तित्व राहणार नाही. माझी वसुंधरा याअभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित विविध उपक्रम महापालिका राबवित आहे. माझी वसुंधरा ३.० अंतर्गत पर्यावरण विभागामार्फत नागरिकांमध्ये पर्यावरण बद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षापासून प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवित आहेत. महापालिका करत असलेल्या कामची दखल घेत माझी वसुंधरा अभियान ३.० अभियान अंतर्गत ३ लक्ष ते १० लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरामध्ये अहिल्यानगर महापालिकेला राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून रूपये ६ कोटीचा पुरस्कार दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित मुंबई येथील एनसीपीएमध्ये झालेल्या ‘माझी वसुंधरा ३.० सन्मान’ सोहळ्यात मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अहिल्यानगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ.पंकज जावळे व उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांना प्रदान करण्यात आला.

शहर सौंदयीकरण व स्वच्छता स्पर्धा

महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदयीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ मध्ये अहिल्यानगर महापालिकेने ड वर्ग महापालिकांच्या गटामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला. २० एप्रिल रोजी नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मा. श्री मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव मा. श्री भूषण गगराणी, प्रधान सचिव मा. श्रीमती सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक श्री. किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा ५ कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर महापालिकेच्या शिरपेचात या राज्यस्तरीय यशाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेची तयारी करताना केवळ स्पर्धेपुरता विचार न करता शाश्वत स्वच्छतेची काम करणाऱ्यावर महापालिकेने कायमच भर दिला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा क्षेत्रात २४१४ वैयक्तिक शौचालय बांधण्यात आली आहेत. शहरांमधील ज्या कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. जी कुटुंबे उघड्यावर शौचास जात होते, अशा कुटंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशाप्रकारे शहरातील प्रत्येक कुटुंबाला शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन अहिल्यानगर शहर हागणदारीमुक्त शहर झाले आहे.

अहिल्यानगर महानगरपालिका करत असलेल्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेमध्ये प्रशासक तथा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ड वर्ग महानगरपालिका गटामध्ये राज्य पातळीवर अहिल्यानगर महापालिकेला  ३ रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. तसेच नाशिक विभागामध्ये प्रथम  क्रमांक प्राप्त झाला आहे. याचबरोबर कचरामुक्त शहरांसाठीचे ३ स्टार व हागणदारी मुक्त शहराचा ODF++ दर्जा प्राप्त आहे. महापालिका स्थापनेपासून उत्तोरोत्तर प्रगती करत यावर्षी सर्वोत्तम क्रमांक प्राप्त केला आहे.